१.
नजर तशीही हटते का बघ
तुझ्याचसाठी नटते का बघ
नसेल पाणी आग उसळता
घरात भांडण मिटते का बघ
पहाड फोडत जाते कविता
तुला सुपारी फुटते का बघ
पहा जरासे अंतर ठेवुन
तुलाच मजविन कटते का बघ
उगाच अपुले तू तू मी मी
तुला मला हे पटते का बघ
२.
कातळाआतले झरे होते
बाप जे बोलला खरे होते
तोडले पाय आज माशांनी
कालचे खेकडे बरे होते
शेवटी घोळ घातला त्यांनी
नेमके तेच सोयरे होते
धाव घ्यावी जिवास सांभाळुन
मग कुठे शतक साजरे होते
मान अथवा खरे नको मानू
नारळाचेच खोबरे होते
या जगी सांग जन्म घेताना
कोणते बाळ हासरे होते
३.
जेवढा गजबजाट असतो बघ
तेवढा शुकशुकाट असतो बघ
फार येतो जवळ नको तितका
चेहरा तो पिसाट असतो बघ
सांगतो गोष्ट साच वर्माची
तो मनाने अफाट असतो बघ
बडबडे एरवी वृथा बाष्कळ
ऐनवेळी मुकाट असतो बघ
चढ उतारास भेदणे असते
मार्ग पुढचा सपाट असतो बघ
....................................................
बाळ पाटील
'मुक्ताई ' 28/275,डीप.आय.सी.बायपास रोड,रिलायन्स ऑफीस समोर,धाराशिव
मो.8308503399

No comments:
Post a Comment