तीन गझला : राज राठोड

 




१.


बाप राबतो शेतामध्ये

पोरगा बिझी इंस्टामध्ये


तगुन आहेत मुळे अजूनी

ऊन,पाऊस, वाऱ्यामध्ये 


नाव येताच ओठांवरती

किती लाजली गालामध्ये


ठेच लागते पायाला पण

उठते कळ का हृदयामध्ये


ओढ आटली रक्तांमधली

दरी वाढली नात्यामध्ये


रोज टाकतो मारुन इच्छा

जगशील किती साच्यामध्ये


सहवास तुझा हवाहवासा

या जगण्याच्या व्यापामध्ये


२.


द्वेष वाढतो... द्वेषाने

प्रेम वाढते... प्रेमाने


बुद्ध मनीचा जागव तू

चल शांतीच्या मार्गाने


या मातीचा चाकर मी

मळा फुलवतो घामाने


एक वासरू भरकटता

दूर लोटले कळपाने


प्रश्न वाढतिल प्रश्नाने

उत्तर दे तू मौनाने


पाय पोळले...पोळू द्या

मन झपाटले ध्येयाने


३.


राहिला नाही भरोसा कोणत्याही मोसमांचा

राहिला नाही भरोसा कोणत्याही माणसांचा


कैकदा जो ठोकरीने होत नाही जर शहाणा

दोष नसतो हा खरेतर कोणत्याही पावलांचा

.

कोरडे नक्षत्र सारे देउनी गेली मला ती

सोसला मग जिंदगीभर मी उन्हाळा आठवांचा


नाचगाण्यांवर डिजेच्या साजऱ्या होती जयंत्या

का असा जाईल जपला वारसा हा पूर्वजांचा?


वाट बघुनी पावसाची रान सारे वाळल्यावर

पाडला पाऊस त्यांनी कोरड्या आश्वासनांचा

..................................................

No comments:

Post a Comment