तीन गझला : विद्या जाधव-देशमुख

 



१.


काळजावर एक फुंकर

प्रेम म्हणजे जादुमंतर


पाहिजे तो वेळ घे तू

ठीक आहे सांग नंतर


जन्म घेते माणसाची

लालसा येथे निरंतर


सोडवेना देह-वेढा

प्राणही मोठा बिलंदर


स्पर्शता वारा गुलाबी 

वाटते दोघांत अंतर


एक धारा वास्तवाची

वाहते आहे निरंतर


आकळेना वाण कुठले

एवढा झालाय संकर


संपले माणूसपण की

काळ आहे हा भयंकर


२.


क्लांत आहे भ्रांत आहे

पण तरीही शांत आहे


आज का निःशब्द झाला 

वेंधळा एकांत आहे


कोणता अवघड असा तू

मांडला सिद्धांत आहे


भासतो आहे खरा पण

झूठ अन् धादांत आहे


या तुझ्या रे वागण्याने

ओढला विश्वान्त आहे


३.


कायद्यांचे काय झाले?

फैसल्यांचे काय झाले?


पाळले नाही कधी त्या

वायद्यांचे काय झाले?


सावरूनी झेलणाऱ्या

पायऱ्यांचे काय झाले?


राबले जे हात होते

आज त्यांचे काय झाले?


चमकल्या ज्या काल होत्या

चांदण्यांचे काय झाले?


सोबतीने रोज होत्या

सावल्यांचे काय झाले?


खेळले ज्यांच्या सवे त्या

बाहुल्यांचे काय झाले?


लाटलेल्या योजनांच्या

फायद्यांचे काय झाले?

..................................................

No comments:

Post a Comment