तीन गझला : सौ.प्रिया कौलवार

 




१.


भूलवायचा जगाला बाहेरचा उजाळा

होता जिच्या मनाचा उध्वस्त पोटमाळा


करतेस चिंब ओले देऊन पावसाळा

वाटून दे तुझाही आई कधी उन्हाळा


महिनाअखेर माझा दिसतो खिसा रिकामा

करते हिशोब मी पण चुकतोच ठोकताळा


लाखोंमधून येते हातात एक दमडी

अनुदान योजनेचा उडतो असा धुराळा 


जन्मासवे मिळाली ही हीन जात मजला

घ्या माणसात तुम्ही मी ना कुणी निराळा


देणार हात नाही तुजला कुणीच येथे

का वेदने निघाली शोधायला जिव्हाळा


नाही महत्त्व जेथे वय ,जात दाखल्याला

मी काढणार ऐसी दुनियेत एक शाळा


हिणवू कसे फळ्याला रंगावरून त्याच्या

उज्ज्वल भविष्य करतो जर तोच रंग काळा


२.


झाली होती तिच्यामुळे ही नजर गुलाबी

भुरळ पाडली... दिसू लागले शहर गुलाबी


आज मला तर अमृतसुद्धा फिके वाटले

ओठांमधुनी तिच्या चाखता जहर गुलाबी


पुढे निघाली ती ओझरता स्पर्श देउनी

लगेच आला सर्वांगाला बहर गुलाबी


ती येते अन् थर दुःखाचे काढुन जाते

मिठीत घेते आणिक करते प्रहर गुलाबी


तुला पाहुनी पाउस सुद्धा खट्याळ होतो

वाऱ्यावरती उडतो जेव्हा पदर गुलाबी


ज्या पाण्याला स्पर्श जाहला तुझा मखमली

त्या पाण्यावर येते हलकी लहर गुलाबी


अजूनसुद्धा त्यास पाहुनी घमघमतो मी

आठवणींचा गुलाब करतो असर गुलाबी


या ओठांची लाली बघ ना तशीच आहे

ज्या ओठांनी तुझे चुंबिले अधर गुलाबी


नजरेमधुनी मदनबाण ती सोडत असते

जखम तिची ही करून जाते कहर गुलाबी


३.


ओठ तुझे की सांग प्रिये हे साखर मिश्रित लोणी 

मधुमेह मला होइल इतकी भरते का तू गोडी


तुझे कथ्थयी डोळे आणिक, मी त्या डोळ्यांमधला 

याच्याशिवाय दुसरे काही मला आठवत नाही


रिमझिम पाउस धुंद गारवा दोघांमधली कॉफी

साखरेविना गोड लागली होती तेव्हा थोडी


काळजात तू राहतेस पण नशिबामध्ये नाही

नियम जगाचा कुणी प्रियेला बनवत नाही राणी


पूर्णत्वाला शेर आपुला कसा जायचा  सांगा

उरल्याविन जर अधुरा आहे प्रत्येकाचा सानी


आडच आल्या प्रेमाच्या जर कट्टर पंथी पटऱ्या

धावेल कशी पाषाणावर दोन जिवाची  गाडी


अखंड पाउस बरसत जावा असे वाटले तेव्हा 

छत्रीमध्ये स्वतःहून ती माझ्या जेव्हा आली

...................................................

सौ. प्रिया कौलवार

( गझलप्रिया )

पंढरपूर

No comments:

Post a Comment