तीन गझला : पांडुरंग जाधव

 



१.


तुझी पंढरी तुला लखलाभ विठ्ठला

दे मला परत माझाच गाव विठ्ठला


भेटण्यास ये वीट सोडून एकदा

युगायुगांचा संपवू वाद विठ्ठला


होते नव्हते तुझ्याच ठायी अर्पिले

कशाला अता फिरवतो पाठ विठ्ठला ?


सकाळ दुपार दिवसभर फोन वाजला

आली नाही कुणाची साद विठ्ठला !


मी साऱ्यांशी माझे नाते तोडले

केवळ तुझाच मला आधार विठ्ठला


२.


समज एवढी कुठून येते मुलींना

कोण समजून इतके घेते मुलींना


असतात जरी मुली कितीही लाडक्या

परस्पर एक सासर नेते मुलींना


मक्तेदारी होती तुमची मुलांनो

जमते सारे आता ते ते मुलींना


चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना

आई हल्ली पुस्तक देते मुलींना


एवढा करू प्रयत्न आपण यारहो

मिळायला पाहिजे हवे ते मुलींना


३.


स्वतः स्वतःवर मरू कितीदा

स्तुती स्वतःची करू कितीदा


तसे खरेतर कुणीच नाही

तरी कुणाला स्मरू कितीदा


बनून वेडे जगून घ्यावे

उगा शहाणे ठरू कितीदा


प्रवास माझा सुरू नव्याने

मिळेल संधी हरू कितीदा


विचारती धर्म जात माझी

असे रकाने भरू कितीदा


..............................................

पांडुरंग महादेव जाधव, 

नवीन पनवेल

No comments:

Post a Comment