तीन गझला : श्रीदासुत

 




१.


ठेव एखादा दगड ठेचाळण्यासाठी

दे नवी कोरी जखम गंधाळण्यासाठी


एक टिचकीही पुरेशी प्रेमभंगाची

काळजाचा आरसा भेगाळण्यासाठी


मी जगाची यामुळे पर्वा करत नाही

तू मला आहेस ना सांभाळण्यासाठी


मी नदीच्या त्या ठिकाणी एकटा बसतो

आठवण येते जिथे कवटाळण्यासाठी


कैकदा तर प्रेम डोळयांनी सहज होते

अन् कधी तर जन्म जातो भाळण्यासाठी


बाळ समजुन नेहमी घेते मुका त्याचा

ती किती झुरते बिचारी पाळण्यासाठी


सातनंतर वाट बघते बायको माझी

दोन डोळयांनी मला ओवाळण्यासाठी


चल पुन्हा आपण नव्याने चाचणी घेऊ

गोडवा ओठातला पडताळण्यासाठी


जीव गेला पण तरीही वैर ना सरले

केवढी गर्दी उसळली जाळण्यासाठी


२.


उन्हाने सावलीला मारला होता असा डोळा

उडाया लागला घेऊन गिरकी खिन्न पाचोळा


अशी शालीनता सांभाळते माझ्यात बुजरेपण

कुणी सांभाळते विधवा जसा पोटातला गोळा


मनाला सूज कसली नेमकी आली कळत नाही!

कुणी अलवार शब्दांनी मनावरती मलम चोळा 


प्रसिद्धी माणसाला एवढी चिटकून बसते की,

जसा घालून बसतो चंदनाला सर्प-वेटोळा


लिहावी वाटली होती मलाही ओळ प्रणयावर

तुम्ही तोंडात माझ्या संयमाचा कोंबला बोळा 


शिगेला पोचल्यावरती विठू सायुज्यता माझी 

तुझ्या चरणांवरी ठेवेन माझा जन्म गाभोळा


३.


जुनी वंशावळी उकरून डाटा काढला

कितीदा तोच तो इतिहास भाटा काढला 


जिला मी एक सुंदर फूल समजत राहिलो

तिने सुमडीमधे माझाच काटा काढला


तिला वादात माझे शब्द झोंबू लागले

तिने मग आसवांचा फौजफाटा काढला 


असा मी काढला होता इगो माझ्यातला

जसा डोक्यातुनी सडका बटाटा काढला


घराबाहेर  सासू  सासऱ्यांना  काढले...

तिने वरतून प्रॉपर्टीत वाटा काढला


मुलांना प्रश्न आला 'स्वच्छ्ता विषयी लिहा'

मुलांनी उत्तरादाखल 'खराटा' काढला 


जगाला यामुळे करणार नक्की भस्म मी

त्रिपुंडागत तिलक माझ्या ललाटा काढला


..................................................


No comments:

Post a Comment