तीन गझला : डॉ शशिकांत गंगावणे

 



१.


रोज पडतो प्रश्न त्याला

काय झाले पावसाला


कोळशाचा रंग काळा 

जन्म देतो तो हिर्‍याला


बदल सवयी जीवनाच्या 

नित्य तू रडतो कशाला 


काम नाही धाम नाही 

'नो! ' म्हणाली, राग आला!

 

भेट होते श्वापदांची 

शोधता मी माणसाला


२. 


शोध घेता सापडेना ती नजर

काळजाचा ठाव घेणारी नजर


झाकल्या देहास करते नागडी

वासनेची आग असलेली नजर 


मंडपाच्या कोपऱ्याला दाटली 

कौतुकाचे गीत गाणारी नजर


मूल पडले आणि रडले एकटे

धावते आईपुढे बाची नजर


वेल बांधावर फुलाया लागली 

रोज छळते एक तिरकीशी नजर


३.


नको करू तू उगीच त्रागा

मनात माझ्या तुझीच जागा


भल्या पहाटे निसर्ग ताजा 

तरी रिकाम्या अजून बागा 

 

अजून ओल्या जुन्याच जखमा 

नवीन आता कशास मागा


घरात दरवळ कुठून यावा

फुले मिळाली, जुळे न धागा 


गझल रचावी जलौघवेगा

लगालगागा लगालगागा

....................................................

डॉ शशिकांत गंगावणे,

वडाळा, मुंबई

No comments:

Post a Comment