तीन गझला : संजय कुळये

 




१.


भाबडा विश्वास होता पावसावरती 

पेरली स्वप्ने उद्याची काळजावरती 


चोचले पुरवत निघालो मीच देहाचे 

ठेवला ताबा कुठे होता मनावरती 


चेहरा विद्रूप दिसतो केवढा माझा 

राहिला विश्वास नाही आरशावरती 


खून केला या ढगांनी काल बापाचा 

आज बरसू लागले त्याच्या शवावरती 


तू तुझी... माझा कसा मी सांगतो आपण 

बोल ना माझ्या तुझ्यातिल अंतरावरती 


मार्ग झाला चार पदरी हा विकासाचा 

पाखराची कैक घरटी पाडल्यावरती 


आत्महत्या होत नाही एकही येथे 

तू भरवसा ठेव माझ्या कोकणावरती 


२.


मला पाहुनी पंख पसरले आयुष्याने 

उगाच नाही मला निवडले आयुष्याने 


चांदण्यात मी बहरत होतो प्राजक्तासम 

माझ्यासाठी ऊन झेलले आयुष्याने 


मला सुखाचे अमृत पाजत असतानाही 

दुःखाचे प्यालेच रिचवले आयुष्याने 


मारत होतो उंच भरारी गगनामध्ये 

घरटे माझे छान राखले आयुष्याने 


धुंदीमध्ये कधी चुकीचे पडले पाउल 

तेव्हा तेव्हा कान टोचले आयुष्याने 


वसंत आला आहे आता चिंता नाही 

त्यासाठी पण शिशिर सोसले आयुष्याने 


असे वाटले हरलो आता डाव येथला 

हुकुमाचे मग पान टाकले आयुष्याने 


३.


उन्हाचा कैफही चढतो जरा झेलून थोडे बघ 

तसे तर चांदणेही पोळते माखून थोडे बघ 


लिहुन मी ठेवल्या ओळी तुला ज्या पाहिजे होत्या

तुझ्या हृदयातले पुस्तक जरा चाळून थोडे बघ


विनाकारण जगाचे या उगा घेतोस तू ओझे

असे त्याचे वजन आहे किती तोलून थोडे बघ


 कशाला गोडवे गातोस साध्या अत्तराचे तू

तसा तर घामही गंधाळतो, राबून थोडे बघ 


इथे घेऊन तू आलास काही श्वास येताना

किती उरलेत ते बाकी अता मोजून थोडे बघ


...................................................

No comments:

Post a Comment