तीन गझला : सौ. निशा चौसाळकर

 


१.


पत्र त्याचे  पूर्ण आहे वाचलेले

काय आहे नेमके पण खोडलेले


वेदना दिसतात हल्ली वेगळ्या का?

चेहरे आहेत त्यांनी झाकलेले


सांगते कानी कळीच्या फूल आहे

वय तुझे अर्धे अधिक तर संपलेले


वाटले मी गाठले आभाळ त्याला

उंच वृक्षावर सदा ते पोसलेले


लक्षपूर्वक ऐक माझ्या बोलण्याला

शब्द घे जाणून माझे गाळलेले


लेखणीला येत गेली धार नाहक

काळजाला शब्द होते लागलेले


राहणे जमणार नाही केंद्रस्थानी

मी परीघाला कधीचे लांघलेले


२.


पेरणीला पावसाचा एकदा विश्वास दे

पेरल्यावर घाम खारा, मोतियांची रास दे


मागणे शिशिरात आहे एवढे देवाकडे

पान गळल्यावर तरूला पालवीची आस दे


भोवती फिरते तुझ्या मी, पाहते कायम तुला

लागण्यापूर्वी ग्रहण थोडा तरी अदमास दे


घेतल्यावर झेप गगनी मागते इतकेच की

ओढ मातीची हवी अन् घरकुलाचा ध्यास दे


दूर जाताना स्मृतींचा हट्ट  लाडिक एवढा

काळजाच्या कोठडीचा गोड कारावास दे


केवढे उपकार करतो  वृक्ष सृष्टीवर सतत

जन्म पुढला थोर त्याला मानवी हमखास दे


चंद्रताऱ्यांनी कशाला रात्र नटलेली हवी

हात धरल्यावर निशेचा चांदव्याचा भास दे


३.


मर्म नेमकेच बोलण्यात यायला हवे

गूढ अंतरातले सहज  कळायला हवे


पंख लागलेत जर हवेत फडफडायला

पिंजऱ्यास  तोडणे तुला जमायला हवे


आजच्या सुखात जर बुडायचे असेल तर

दुःख कालचे दफन मनात व्हायला हवे


वादळात नाव शांत झुंज देत राहते

प्राक्तनास तू तसेच तोंड द्यायला हवे


पानगळ निमूट वृक्ष झेलतो हसत हसत

बीज आपल्या मनी तसे रुजायला हवे


राधिका  बनू तुझी कि रुक्मिणी तुझी बनू?

लाडकी हरी तुझी तुळस  बनायला हवे !


चंद्र चांदणी कुशीत खेळते तुझ्या निशा

लेखनात चांदणे तुझ्या झरायला हवे


...................................................

सौ.निशा चौसाळकर 

अंबाजोगाई


No comments:

Post a Comment