१.
पोट भरावे चोरत दाणे जमले नाही
कष्टाशिवाय कधीच खाणे जमले नाही
मार्ग चुकीचे पकडून पुढे गेले सगळे
खोटे बोलत मोठे होणे जमले नाही
हृदयामधले हृदयामधल्या कुपीत आहे
कोणालाही तेथे जाणे जमले नाही
खोटे नाणे दुनियेच्या डोक्यावर बसले
दुनियेला खणखणीत नाणे जमले नाही
माझ्या हक्काचे होते तितक्यावर जगलो
भ्रष्टाचाराचे चाराणे जमले नाही
बोलायाचे जे काही ते खुल्लमखुल्ला
दुसऱ्यांचे करणे गाऱ्हाणे जमले नाही
२.
तुझ्या नावातले अक्षर जणू अविभाज्य होतो मी
कधीकाळी तुझ्यासाठी तुझे साम्राज्य होतो मी
कुणीही येत गेले अन् मला भागत पुढे गेले
असा आयुष्यभर अवघ्या जगाचा भाज्य होतो मी
कधी ना लांघता आल्या कुठे माझ्या मला कक्षा
जुन्या सीमा सदा सांभाळणारे राज्य होतो मी
कपाळावर पुसट रेषा कुणी लिहिल्यात नशिबाच्या
पुढे कष्टात होतो पण फळाला त्याज्य होतों मी
गुन्हे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बघणारे
गुलामी लोकशाहीचे नवे गणराज्य होतो मी
....................................................
अमोल गोंडचवर
केशव नगर अकोला
८२७५३११९९६
No comments:
Post a Comment