१.
तू नसण्याने मला वेदना- वादळ छेडत आहे
तरी धिराने मी अपुला 'घरगाडा' ओढत आहे
सजणेधजणे त्यागुन सुध्दा तू गेल्यानंतर मी
हैवानांच्या वखवखलेल्या नजरा झेलत आहे
समजावू मी कसे सांग ना जिवास त्या इवल्याशा
गोड आपुली पोर धाकटी तुलाच घोकत आहे
मीच बाप अन् आई आता आपुल्या चिमुरड्यांची
धैर्य द्यायला तुझी आठवण माझ्यासोबत आहे
घरी नि रानी राबत मागे दिवस लोटते मी पण
तुझ्याविना ही रात्र मला रे भयाण पोळत आहे
२.
तुझी चाल ती तुझ्याचसाठी नफ्यात आहे
बाकी विश्वासाची दुनिया धुक्यात आहे
कसा द्यायचा धीर भुकेला सांग मला तू
खुलीच दुर्डी अशात अमुच्या शिक्यात आहे
घामाला फळ येते रग्गड अमुच्याही पण
द्वाड दलाली दाम घालते खिशात आहे
देते आहे साक्ष तुझी ती श्रीमंती रे
देश आपुला कुणी घातला घशात आहे
जरी टाळते कर्तव्याला नोकरशाही
प्रसाद येतो तरी तिच्या का पशात आहे
३.
पुन्हा जिव्हाळ्याच्या वळणावर पाय ठरू दे सर्वांचा
आम्ही सारे एक म्हणाया जीव धजू दे सर्वांचा
प्रत्येकाला सांग द्यायला हृदयी जागा इतरांना
एकोप्याच्या सुंदरतेने गाव नटू दे सर्वांचा
एकत्र घेउ मंदिर,मस्जिद,चर्च,विहारे बांधाया
राम,रहिम, येशू अन् गौतम अम्हा म्हणू दे सर्वांचा
नाचायाला नकोत ज्ञानी,बिनडोकाच्या तालावर
विवेक बारा महिने जागा अता असू दे सर्वांचा
काही कर पण तू लोकांना,आण जरासे ताळ्यावर
तुझ्या कृपेने भाव मत्सरी जिता जळू दे सर्वांचा
.................................
बालाजी मुंडे 'बिंधास्त '
मु.पो.किनगांव
ता.अहमदपूर जि.लातूर
संपर्क -9588660633

No comments:
Post a Comment