तीन गझला : सौ. प्रीती राकेश वाडीभस्मे

 



१.


मौन झाल्या काळजाचा एकदा चल तळ बघू

तोडल्या गेल्या फुलांची वेदना, कळवळ बघू


सावलीच्या पावलावर पाय ठेवू मी किती 

ये उन्हाशी खेळ खेळू अन् उन्हाची झळ बघू


जीवनाचा थांगपत्ता लागला आहे कुणा?

पण प्रयत्नांचा तरीही टाकलेला गळ बघू


दूर गेल्या पाखरांनो, या जरा परतून रे!

मायच्या डोळ्यातली चिंता कधी कळकळ बघू 


लेकरू होऊन जगलो आजवर त्यांचे जरी 

बाप होऊ, काळजीची एकदा तळमळ बघू


बघ! मुलींनी या युगाचा कोंडमारा सोसला 

आज त्यांच्या जाणिवांचे एकवटले बळ बघू


घालतो आंघोळ आपण या तनाला रोज पण 

या मनाशी साचला आहे कितीसा मळ बघू


२.


पापणीचे बंद कर तू दार प्रेमाने

स्वप्न कर हृदयातले साकार प्रेमाने


प्रेम हे वादळ असावे काळजामधले 

मांडलेला आत हाहाकार प्रेमाने


जीवनाची वेलही कोमेजली होती 

एकदा झाली परत गुलजार प्रेमाने


मौन झालेल्या विणेची तार होते मी 

लाभला आता नवा झंकार प्रेमाने


संपल्या संभावना अन्  शक्यता सरली 

मांडले मग जीवनाचे सार प्रेमाने


पूर्ण मी विश्वास जेव्हा ठेवते त्यावर 

पाठ फिरता तोच करतो वार प्रेमाने


चांगली होती तुला भेटायच्या आधी 

जाहली 'प्रीती' पुढे लाचार प्रेमाने


३.


आले तर येऊ दे काही अडचण नाही

सुख-दुःखाच्या आगमनाला कारण नाही 


घेईल धाव तुझ्या दिशेने चावट इच्छा

हृदयाला जर निर्मोहाचे कुंपण नाही


ग्रहताऱ्यांना पत्रिकेमधे नकोस मांडू 

जीवन हे जीवन आहे तारांगण नाही 


प्रेमामध्ये घाबरण्याचे कारण कसले

माझा बहर ऋतूंना कुठल्या तारण नाही


या देहाचे सुंदर मंदिर होऊ शकते

तू जर त्याच्या आत ठेवले 'मी'पण नाही


तुला स्वतःची सुंदरता जर बघायची तर

मनासारखे सुंदर कुठले दर्पण नाही


येता-जाता फुंकर मारुन उडवू बघता 

'प्रीती' म्हणजे निर्जीव धुळीचा कण नाही


....................................................

प्रीती तडस वाडीभस्मे, वर्धा


2 comments: