तीन गझला : डॉ. स्वाती भद्रे आकुसकर

 




१.


कागदी होडी जणू खाते पुराचे हेलकावे

तेवढे छळतात जीवाला मनाचे हेलकावे


नागमोडी वाट ही घेऊन ओझे चालवेना

त्यात अर्ध्या घागरीमध्ये दुधाचे हेलकावे


उंच जातो कैकदा बेभान झोका जीवनाचा

देत जातो सावलीमध्ये उन्हाचे हेलकावे


सुप्त इच्छांचा मनाच्या संपला हुंकार जेव्हा

श्वासही झाले घडीच्या दोलकाचे हेलकावे


रोज हंबरते किती गोठ्यात आई वासराची

ऐकुनी काळीज खाते का कुणाचे हेलकावे  


२.


खूप गाजली जी दोघावर चर्चा झाली 

जरा भेटलो अन् पारावर चर्चा झाली 


तू आल्याची खबर पसरली गावामध्ये 

पुन्हा एकदा बघ माझ्यावर चर्चा झाली 


जाताना तो फक्त म्हणाला 'येतो आता'

याही वेळी कुठे कशावर चर्चा झाली 


घंटा नक्की गळ्यात त्याच्या बांधू आपण 

अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली 


किती मनाने अस्थिरतेचा कळस गाठला 

व्यर्थच गेली जी पाऱ्यावर चर्चा झाली 


छान उमलले सावलीतही या झाडीच्या 

बागेमध्ये रानफुलावर चर्चा झाली 


तू असताना जगास दिसल्या फक्त उणीवा

तुझ्या गुणांवर तू गेल्यावर चर्चा झाली 


३.


हो ! मानली आहे अता मी हार आयुष्या 

नाही तुझे कोडे मला सुटणार आयुष्या


कोणी कशाला प्राक्तनाशी व्यर्थ झुंजावे

जे व्हायचे ते शेवटी होणार आयुष्या


वाट्यास आले जर ऋतू काही वसंताचे

होईल माझी जिंदगी गुलजार आयुष्या


नाही धमक देशील नजरेला नजर माझ्या

पाठीमधे करतोस हल्ली वार आयुष्या


घेऊ नको इतकी परीक्षाही कुणाची तू

वाटेल श्वासांचा जिवाला भार आयुष्या


आणू नको कुठला कवडसा बंद दाराशी

कर एवढे माझ्यावरी उपकार आयुष्या


सर पोचली जर एक त्या हृदयात स्वातीची

उरणार नाही कोणती तक्रार आयुष्या


...................................................

डॉ स्वाती भद्रे आकुसकर

नांदेड

No comments:

Post a Comment