१.
नात्यात मी स्वतःला गुंतून घेत असते
धागे मनामनाचे गुंफून घेत असते
मुलगी हवीच होती ही खंत वाटली की
नातीस त्याच जागी पाहून घेत असते
मांडायचे कसे मी हे दुःख अंतरीचे
मन जाळुनी स्वतःचे पचवून घेत असते
गर्भात नाळ जेव्हा जुळते तिच्या मनाशी
संस्कार अर्भकावर करवून घेत असते
मिळते कुठे कुणाला स्वप्नात पाहिले जे
आहे जसे,तसे 'ती ' समजून घेत असते
२.
कुणी कुणाशी बोलत नाही हल्ली हल्ली
कुणी कुणाला भेटत नाही हल्ली हल्ली
कोण दुजा अन् कोण आपला समज हवी पण
कसे कुणाला समजत नाही हल्ली हल्ली
जिवापाड ती जपते आहे मुलास अपुल्या
कुणाचेच तो ऐकत नाही हल्ली हल्ली
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळते सारे
हेच कुणाला उमगत नाही हल्ली हल्ली
या कानाचे त्या कानाला कळू न द्यावे
नियम कुणी हे पाळत नाही हल्ली हल्ली
प्रीत तुझ्यावर जडली आहे कळते सारे
कळूनही मन हुरळत नाही हल्ली हल्ली
कळते सगळे पण वळते का?प्रश्न गहन हा
उत्तर याचे उकलत नाही हल्ली हल्ली
तुझा भास मज होतो जेव्हा तेव्हा कळते
तुझ्याविना मज करमत नाही हल्ली हल्ली
नावडतीचे मीठ आळणी समजू शकतो
आवडतीही धकवत नाही हल्ली हल्ली
३.
नेसला सोवळे, टाळ हाती धरी
रुख्मिणीसंगती नाचतो श्रीहरी
रूप हे साजिरे पाहुनी दंगले
नाम येता मुखी बोलतो जय हरी
आस ही लागते भेटण्याची तुला
वेड तू लावतो भक्त येण्या घरी
पाहशी अंत का सावळ्या विठ्ठला
सांग शोधू कुठे सावळी पंढरी
आसरा दे तया यातना जाण तू
दूर कर दुःख जे साठले अंतरी
सोडना वीट तू, कर कटीचे अता
बैसला शांत का चंद्रभागेतिरी
सोडुनी चाकरी दर्शना धावतो
कष्ट जाणून हे देत जा भाकरी
..................................................

खूप छान.
ReplyDeleteधन्यवाद मॅम 🙏
Deleteखूपच सुंदर रचना ताई👌👌👌
ReplyDeleteमनापासून धन्यवाद... 🙏
Delete