तीन गझला : कविता क्षीरसागर

 


१. 


कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे?

जिणे साचलेले तलावाप्रमाणे


नको जीवना क्रूर घालू उखाणे

दिवस रोजचा यक्षप्रश्नाप्रमाणे


कुणाच्या मताने असे वागशी तू

मना वागना रे शहाण्याप्रमाणे


इथे पोचल्यावर मला उमजले की

उगा चालले मी नकाशाप्रमाणे 


दिसे चेहरा एक ऐन्यात परका

कळेना असे हा कुणाच्याप्रमाणे


न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा

दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे


करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे

न जगणे जमे दीनवाण्याप्रमाणे 


तिथे जायचे पण इथे पोचले मी

तरी चालते मी रिवाजाप्रमाणे


किती खोल घनघोर अंधार भवती

तुझ्या सोबतीने...प्रकाशाप्रमाणे


२.


घर रिकामे मन रिकामे शब्दही रागावले

का अशी केली अवस्था, काय देवा साधले ?


मी कुठे म्हणते असे की प्रेम नाही चांगले 

पण खरे सांगा कुणाचे जाहले त्याने भले ? 


लुप्त झाले प्रेम आता जगरहाटी राहिली 

डुंबणे प्रेमात कायम...भाग्य कोणा लाभले ? 


काय करतो तो अताशा  जीव ज्यावर लावला 

गुंतला की विसरला? ते   हाय नाही समजले !


ती जिथे जाईल तेथे  प्रश्न पाठी लागती 

एकटी का राहते? कोणी कुणाला सोडले ?


उत्तरांना टाळते ती फक्त हसतच राहते

येत ना बाहेर अश्रू , वळण सुंंदर लावले 


पापण्यांचा उंबरा ओलांडला नाही कधी

आसवांना फार सुंदर वळण आहे लावले 


सांत्वनाला लोक येती की तमाशा पाहण्या 

तेच ते सांगून आता दारही कंटाळले 



३.


चुरगळून जी पडली आहे 

इच्छांची ती यादी आहे 


पापाला ती रुळली आहे

नवरा वाल्या कोळी आहे


कळणार कसे कष्ट आमचे?

बुडाखालती गाडी आहे 


उडून गेले बहुधा पिल्लू

फांदी कातर झाली आहे 


एकटेपणा दूर पळाला 

स्मार्ट फोन अन् टीव्ही आहे


दाणे टिपण्या येती चिमण्या 

खिडकी उगाच भुलली आहे


टाळ्या जी घेतेय स्टेजवर 

हो! ती माझी मुलगी आहे 


काठाने जो पोहत असतो

त्याच्यातच ती बुडली आहे 


टिकवुन ठेवू नाते आपण 

जोवर त्याची गोडी आहे


..................................................

No comments:

Post a Comment