तीन गझला : दिवाकर जोशी

 


१.


नाकासमोर कुठवर चालू जगाप्रमाणे ?

थोडे जगून घेतो माझ्या मनाप्रमाणे


देऊ कसा कुणाला आधार सावलीचा

आयुष्य पेलले मी चढत्या उन्हाप्रमाणे


ती दाखवीत गेली नुसते मळभ धुक्याचे

बरसून रिक्त झालो मी श्रावणाप्रमाणे


माझ्या खुळेपणाची बस एवढी कहाणी

हृदयात एक काटा जपला फुलाप्रमाणे


तू सोडशील केंव्हा गझले हळूच पान्हा

आशाळभूत बघतो मी वासराप्रमाणे


२.


ठेवला इतका कसा विश्वास कानावर ?

झापडे पडली इथे प्रत्येक डोळ्यावर


मी कसा जाऊ तळाशी खोल डोहाच्या ?

बुडबुडा होऊन फुटतो रोज काठावर


जात मागोमाग आली आडनावाच्या

मारला शिक्का तिने माझ्या कपाळावर


हाक आली आतुनी माझ्या वसंताची

पाखरांनो या पुन्हा परतून झाडावर


सोहळा होईल माझ्या अंत्ययात्रेचा

तोरणे बांधू नका इतक्यात दारावर


३.


याच्या त्याच्या मर्जीखातर चालत जाणे

नको वाटते मागे मागे सरकत जाणे


काठावरती आल्यानंतर इतके कळले

सोपे नसते नदीबरोबर वाहत जाणे


पुन्हा नव्याने समोर येतो कोरा कागद

पुन्हा तेच ते काही बाही खरडत जाणे


आत नसावा कुणी वेगळा आत्माबित्मा

जीवन म्हणजे देहासोबत लटकत जाणे


मृत्यू म्हणजे याहुन दुसरे काय असावे ?

स्वतःच एका शून्यामध्ये हरवत जाणे

...................................................

No comments:

Post a Comment