१.
चुकले होते, साॅरी म्हटले जाने भी दो!
नाक घासले, कान पकडले जाने भी दो!
मनापासुनी प्रयत्न केले अपयश आले,
इतक्यातच का जीवन सरले जाने भी दो!
व्यसने सोडा म्हटले त्यांना कुठे ऐकले
आयुष्यातुन पटकन उठले जाने भी दो!
दीड शहाणेपणा तयांचा सुटला नाही,
जग हसते हे कोठे कळले जाने भी दो!
सेटल होताहोता लग्नाचे वय गेले,
केस उडाले, टक्कल पडले जाने भी दो!
वृद्धपणीही जगास म्हटले जवान मी तर,
शून्यावर तंबूत परतले जाने भी दो!
भाषण करण्यापुरता होता जोश तयांचा,
प्रसंग येता मागे हटले जाने भी दो!
प्रियकर समजुन नवऱ्याला मेसेज टाकला,
पुढे काय रामायण घडले जाने भी दो!
पुणेकरांचे सारे काही अचाट बाबा,
जोक कालचा आत्ता हसले जाने भी दो!
२.
साठी येता बुद्धी झाली नाठी आहे!
सोबत करण्या हाती आली काठी आहे!
तोंडामधल्या दातांचीही परवड झाली,
पण खाण्याची इच्छा तरणीताठी आहे!
बायकोस लाडाने म्हटले, ” लव यू, पिल्लू”,
कपाळावरी तिच्या केवढी आठी आहे!
या वयातही तिला पाहुनी मनात झुरतो,
तारुण्याची याद लागली पाठी आहे!
हेमा, वहिदा अन् आशाचे फोटो बघणे,
इतके उरले आता अमुच्यासाठी आहे!
३.
ताकद नाही मात्र खायचे म्हणतो आहे!
सोसत नाही तरी 'प्यायचे ' म्हणतो आहे!
शरीर थरथर करते आणिक वय झालेले,
तरी फुकट एस्टीत जायचे म्हणतो आहे!
नाही म्हटली एकदा तरी कुणास ठाउक,
गिफ्ट नव्याने तिला द्यायचे म्हणतो आहे!
रात्री ढोसुन तराट झाला पूर्ण तरीही,
'उतारा' म्हणून जरा घ्यायचे म्हणतो आहे!
तोंड बोळके हवाच नुसती येते जाते,
मात्र रफीचे गीत गायचे म्हणतो आहे!
कसे कळेना म्हातारीने आव्हान दिले,
म्हाताराही ना हटायचे म्हणतो आहे!
त्याच्या लेखी मन म्हातारे होतच नाही,
या वयातही हुंदडायचे म्हणतो आहे!
४.
“लव यू” म्हटल्यावर ती म्हटली, ”फुरसत नाही!
नशिब तुझे की, गाल तुझे मी सडकत नाही!”
दोन्ही बाजूंनी गाडीला धक्का देती,
वरून म्हणती पुढे कशी ही सरकत नाही?
चंद्र, सूर्य अन् तारे ते काव्यात पेरती,
तरी तयांची कविता काही चमकत नाही!
माझ्या मस्तीमधे सदोदित वागत जातो,
म्हणून दुनिया मला आपला समजत नाही!
शरण बायकोला जाणे, हा उपाय एकच,
अन्यथा तुझी नावालाही धडगत नाही!
घरात असली, तर भांडत असते माझ्याशी,
पण माहेरी जाते, तेव्हा करमत नाही!
माझा राग बघून बायको घाबरते हो,
त्यावेळी मी मुळीच भांडी घासत नाही!
नवे पसारे नवीन गुंते आयुष्याचे,
‘रघुनाथ’, तुला काहीकाही उमजत नाही!
५.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हावे म्हणतो!
मान्यवरांच्या तंबूमधे घुसावे म्हणतो!
असून फटिचर, स्वप्ने त्याची फारच मोठी,
आता सूर्यालाच धराया जावे म्हणतो!
दुनियेमध्ये साधेभोळे बरेच असती,
स्वार्थासाठी त्यांना जवळी घ्यावे म्हणतो!
आपणाहुनी हुशार कोणी जर दिसला, तर -
बघून संधी लवकर लांब पळावे म्हणतो!
जरी फारशी प्रतिभा नसली, हरकत नाही,
करून चोरी, प्रसिद्ध येथे व्हावे म्हणतो!
गटबाजीने साहित्यालाही पोखरले,
जरी कावळे असले, त्यांना रावे म्हणतो!
दुःखांवरती लिहावयाची इच्छा झाली,
म्हणून खोट्या अश्रूंमधे भिजावे म्हणतो!
एवढे तिखट कशास लिहिले? चिडला ना तो,
‘रघुनाथ’, तुला धरून तो मारावे म्हणतो!
....................................................
No comments:
Post a Comment