तीन गझला : बबन धुमाळ

 


१.

हात सुटलेला कधी कळलाच नाही
हात पाठीवर पुढे फिरलाच नाही

केवढी त्यांच्या विचारांची शिदोरी
पाय माझाही कुठे अडलाच नाही

भोगली शिक्षा इथे मी ज्या गुन्ह्याची
समजले नंतर गुन्हा घडलाच नाही

एवढी चढली नशा त्याला यशाची
शब्द कानी मायचा पडलाच नाही

लागता वागायला त्यांच्याप्रमाणे
एकही माझ्यापुढे टिकलाच नाही

गोड शब्दांनी दिली होती समज मी
लाडकीचा मग पदर ढळलाच नाही

घातलेले घाव त्यांनी एवढे की
घेउनी स्वप्ने नवी उठलाच नाही

२.

वागणे अपुले इथे मापात असले पाहिजे
जायचे आहे कुठे डोक्यात असले पाहिजे

दूरगामी तू...कशाला सांगते आहे मला
मोकळेपण आपल्या नात्यात असले पाहिजे

मी तुझा अन् तूच माझी बोलणे सोपे जरी
कोरलेले नाव पण हृदयात असले पाहिजे

लोक हे म्हणती जरीही प्रेम आहे आंधळे
कोण मी अन् कोण तू ध्यानात असले पाहिजे

तू स्वभावाने कितीही गोड असलेली जरी
शब्द जहरी आपल्या भात्यात असले पाहिजे

मायबापाने दिलेले रान आहे मोकळे
मन तरीही आपल्या ताब्यात असले पाहिजे

३.

साचली आहे तुझ्या बघ धूळ अर्जावर
लागते वर्णी इथे तर जात-धर्मावर

काढलेली लायकी चौकामधे त्यांनी
घाल त्यांच्या खोलसा तू घाव वर्मावर

ते जरी कुत्सितपणे हसले गरीबीला
तू नको सोडू कधीही वाट अर्ध्यावर

ना जरी केली शिफारस दोन वाक्यांनी
ठेव कायम तू तुझ्या विश्वास कर्मावर

धर्म मैत्रीचा खरोखर पाळला त्याने
का उगीचच हारल्याचा दोष कर्णावर

घाल आवर तू मनाला सोड वेडेपण
कोण का जाते कुणाच्या सांग सरणावर

जीवनाशी खेळ का हा मांडला आहे
भिस्त यांच्या जीवनाची याच धरणावर

.................................
बबन धुमाळ, रोहाऊस नंबर-21, रौनक व्हीला, जगतापवस्ती, वाघोली, पुणे 412207
मो.9284846393

2 comments:

  1. सर्व गझला छान आहेत सर,अभिनंदन,👌👌💐💐❤️❤️

    ReplyDelete
  2. तिन्ही गझला सुरेख! अभिनंदन! सुंदर सिमोल्लंघन 🌹

    ReplyDelete